राजर्षी शाहू महाराज लोकहित दक्ष राजे : डॉ. नवनाथ शिंदे

0
48

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे अनेक अर्थाने लोकहित दक्ष राजे आणि सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ होते. शाहूंच्या काळात राजेशाही होती तरीही लोक स्वतंत्रपणे वावरत होते, असे प्रतिपादन डॉ. नवनाथ शिंदे यांनी केले.

महागावातील राजा शिवछत्रपती महाविद्यालयात सामाजिकशास्त्र आणि ज्ञान स्रोत मंडळ यांच्यामार्फत राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘पुरोगामी भारताच्या राष्ट्र निर्मितीमध्ये शाहू महाराजांचे योगदान’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. नवनाथ शिंदे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. निवास जाधव होते.

जातीभेद निर्मूलनासाठी प्रयत्न, सक्तीचे प्राथामिक शिक्षण धोरण तसेच दारिद्र्यातील जनतेकडे बघण्याचा मानवतावादी दृष्टिकोन ही तत्वे शाहू महाराज यांच्या समानतेच्या धोरणातून आणि कृतिशीलतेतून दिसून येतात, असे सांगताना आज आपण त्यांचे स्मृती शताब्दी वर्ष साजरे करीत असताना त्यांच्या विचारांशी जवळीक साधली आहे काय? असा प्रश्नही डॉ. शिंदे यांनी उपस्थित केला.

शाहू महाराजांच्या जीवन काळातील विविध प्रसंग आणि कार्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा डी. एस. काळे, प्रा. महादेव माने, प्रा. डी. जी. कापुरे, डॉ. सुकुमार आवळे, प्रा. वनिता वीरकर, डॉ. सुगंधा घरपणकर, डॉ. व्ही. जी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.