राजर्षी छ. शाहूंच्या समाधीस्थळ सुशोभीकरणासाठी ८ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर…

0
10

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सामाजिक क्रांतीचे प्रणेते राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे नूतनीकरण आणि सुशोभीकरणासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून ८ कोटी २८ लाखांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. अशी माहिती झालेल्या ऑनलाईन बैठकीवेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी यांनी दिली.

कोल्हापूरकरांचे शक्तिस्थळ असलेल्या राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या समाधीस्थळासाठी तात्काळ आर्थिक मदत केल्याबद्दल दोन्ही मंत्र्यांचे आभार पालकमंत्री सतेज पाटील यांनी मानले. तसेच याबाबतचा प्रस्ताव आजच कोल्हापूर समाज कल्याण विभागाकडून शासनाकडे पाठविण्यात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.

लोकराजा राजर्षी छ. शाहू महाराज यांच्या इच्छेनुसार बांधण्यात आलेल्या या समाधीस्थळाचे गेल्या वर्षी राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.