कोल्हापूर (प्रतिनिधी) : राजारामपूरी व्यापारी असोसिएशनने कोल्हापूरातील पुरग्रस्त भागातील नुकसानग्रस्त छोट्या व्यापाऱ्यांना आधार दिला आहे. त्यांचा हा उपक्रम प्रेरणादायी असून अशा उपक्रमांमुळे छोटे व्यापारी पुन्हा सक्षमपणे व्यापार करतील. असा विश्‍वास जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी व्यक्त केला.

यावेळी राजारामपूरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली एक हात सहकार्याचा, देऊ आधार व्यापाऱ्यांना या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते आज (मंगळवार) करण्यात आला.

जिल्हाधिकारी रेखावार म्हणाले की, पुरग्रस्त व्यापाऱ्यांच्या बँक कर्जाच्या  अडचणी सोडवण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. विम्या संबंधी राज्य सरकारद्वारे विमा कंपन्यांना योग्य ते निर्देश देण्यात आले आहेत. व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, शेतकरी आणि अन्य सर्वच पुरग्रस्त नागरीकांना जास्तीत जास्त नुकसान भरपाईसाठी प्रशासन सकारात्मक असून लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगितले.

ललित गांधी म्हणाले की, राजारामपूरी व्यापारी असोसिएशन आणि अन्य संस्थांच्या सहकार्याने पुरग्रस्त भागात विविध प्रकारची मदत पाठवली जात आहे. पुरामध्ये अत्यंत छोट्या व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याने त्यांचा उदरनिर्वाह थांबला आहे. यासाठी एक हात सहकार्याचा, देऊ आधार व्यापाऱ्यांना हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्यात पाच छोट्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठीचे संपूर्ण साहित्य देण्यात आले आहे. तसेच भविष्यात व्यापक प्रमाणात हा उपक्रम राबविणार असल्याचे सांगितले.

यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव जयेश ओसवाल, असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सहसचिव विजय येवले, कोषाध्यक्ष अनिल पिंजाणी संचालक महेश जेवराणी, पियूष पारेख, ताराचंद देठीया, भरत रावळ, शैलेश ओसवाल, दर्शन गांधी, लाभार्थी उज्वला पुरेकर, अनिल आरेकर, नितीन महेंद्रकर, व्यापारी उपस्थित होते.