कोल्हापूर (प्रतिनिधी) : सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळाल्याबद्दल मिरवणूक काढून आनंद व्यक्त करताना गर्दी करून कोविड – १९ नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १३ जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये व्यापारी, राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करून सोमवार १९ जुलैपासून सर्व व्यवसाय सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली. कोल्हापूर शहरात सर्व व्यवसाय सुरू करताना राजारामपुरी भागातील व्यापाऱ्यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करण्यासाठी सोमवारी बैलगाडीतून मिरवणूक काढली. यामध्ये महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांच्यासह राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

या मिरवणुकीत कोविड – १९ च्या नियमांचे उल्लंघन करून गर्दी केल्याप्रकरणी गांधी यांच्यासह अनिल पिंजाणी, श्याम बासरानी, दीपक पुरोहित, अभिजीत गुजर, प्रताप पोवार, प्रशांत पोकळे, रहीम सनदी, दर्शन गांधी, गजानन पवार, महेश जेवराणी, सतीश माने, भरत रावळ या १३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. याबाबतची फिर्याद हवालदार विजय पाटील यांनी दिली. राजारामपुरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.