मुंबई (प्रतिनिधी) :  गेल्या अनेक दिवसांपासून अभिजित देशपांडे दिग्दर्शित आणि सुनिल फडतरे निर्मित  ‘हर हर महादेव’ चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली आहे. इतिहासातील अनन्यसाधारण व्यक्तिमत्व असणारे बाजीप्रभूंवर हा चित्रपट चित्रीत करण्यात आला आहे. हा चित्रपट  २५ ऑक्टोबरला रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याआधी चित्रपटातील टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून त्याला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे. यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी छ. शिवाजी महाराजांच्या चित्रपटाविषयी मोठी घोषणा केली आहे.

मराठी अभिनेते सुबोध भावेंनी ‘हर हर महादेव’ या चित्रपटाच्या निमित्तानं मनसे प्रमुख राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्या मुलाखतीला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मुलाखतीमध्ये राज ठाकरे यांनी छ. शिवाजी महाराजांच्या चित्रपटाविषयी मोठी घोषणा केली आहे. छ. शिवाजी महाराज यांच्या चरित्रावर आधारित दोन ते तीन पार्टमध्ये आपण चित्रपट करणार असल्याची घोषणा राज ठाकरे यांनी मुलाखतीत केली.

त्यामुळे आता या चित्रपटाविषयी चाहत्यांची उत्सुकता ताणली गेली आहे.  छ. शिवाजी महाराजांच्या चरित्रावर आधारित हे चित्रपट कसे असतील त्यात कोण अभिनय करेल याची माहिती येणाऱ्या काळात रसिक प्रेक्षकांना समजणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.