मुंबई (प्रतिनिधी) : एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याने शिवसेना पेचात सापडली असून, शिवसेनेत फूट पडली असताना मनसेचे नेते राज ठाकरे हे शिवसेनेत असायला हवे होते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

शिवसेना पक्षाचा उदयच हिंदुत्वच्या मुद्द्यावर झाला होता. याच मुद्द्यावर शिवसेनेला मोठा जनाधार लाभला. पक्षाने राज्यातील सत्ता काबीज करण्यापर्यंत मजल मारली, मात्र याच मुद्द्यावरून आता पक्षात फूट पडली आहे. एकनाथ शिंदे हे आता पक्षावर दावा सांगत आहेत. आमदारांनी साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरे हतबल झाले आहेत. शेवटचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक कार्डचा देखील वापर करून बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन केले होते; मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मिळणारा पाठिंबा वाढत आहे. शिवसेनेतही ५० आमदारांनी पाठिंबा दिल्याचा दावा केला आहे.

२०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र शिवसेनेने भाजपबरोबर न जाता काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षाशी आघाडी करून सत्ता मिळवली. महाविकास आघाडी बरोबर सरकार स्थापन केल्याचे काही शिवसेना आमदारांना रुचले नव्हते आणि त्यांचा रोष होता. या असंतोषाचा नुकताच विस्फोट झाला. अल्पमतातील महाविकास आघाडीचे सरकार वाचविण्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत हे सातत्याने प्रयत्न करीत आहेत. बंडखोर आमदारांना मुंबईत येऊन चर्चा करण्याचे आवाहन करीत होते. शिवसेना आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले होते.