राज ठाकरे यांच्याकडून फडणवीस यांचे कौतुक

0
42

मुंबई (प्रतिनिधी) : आत्ताचे सरकार आणण्यासाठीही अपार कष्ट तुम्ही उपसलेत आणि इतके असूनही आपल्या मनातील हुंदका बाजूला सारून पक्षादेश शिरसावंद्य मानून उप-मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतली. आपल खरोखर अभिनंदन, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दु:खावर फुंकर मारली आहे.

राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे तोंडभरुन कौतुक करत त्यांच्यासाठी खास पत्रही लिहिले आहे. ‘तुम्ही घालून दिलेला वस्तुपाठ देशातल्या आणि राज्यातल्या सर्व राजकीय पक्षातील आणि संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कायमस्वरूपी लक्षात ठेवण्यासारखा आहे. पक्षाचा आदेश हा कुठल्याही व्यक्तीच्या आकांक्षेपेक्षा मोठा आहे, हे तुम्ही तुमच्या कृतीतून दाखवून दिले, असेही राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

‘तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच पुन्हा परताल, परंतु ते व्हायचे नव्हते’; असे नमूद करून राज ठाकरे म्हणतात, ही बढती आहे की अवनती यात मी जात नाही आणि कुणी जाऊही नये; पण एक सांगतो की, धनुष्यातून ध्येयाचा वेध घ्यायचा तर दोरी मागे ओढावी लागते. या मागे ओढलेल्या दोरीला कुणी माघार म्हणत नाही! तुम्हाला या पुढेही बराच राजकीय प्रवास करायचा आहे. तुम्ही तुमचे कर्तृत्व महाराष्ट्रापुढे सिध्द केलेलेच आहे. त्यामुळे देशाच्या भल्यासाठीही तुम्हाला अधिक काम करण्याची संधी मिळो, अशी इच्छा आहे.