राशिवडे (प्रतिनिधी) : गेले महिनाभर उघडीप दिलेल्या पावसाने दोन-तीन दिवसांपासून हजेरी लावली आहे. वेधशाळेने पुणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा या पाच जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर राधानगरी येथील लक्ष्मी जलाशयामधून १३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे भोगावती नदी पात्राबाहेर आली आहे. तर पंचगंगा नदी पात्राबाहेर पडण्यास एक फूट अंतर कमी आहे. तर केळोशी येथील लघु पा. तलाव पुर्ण क्षमतेने भरला असुन सांडव्यावरुन पाणी वहात आहे.

आज (गुरुवार) सकाळी सात वाजेपर्यंत राधानगरी धरण क्षेत्रात ९७ मिली, तुळशी धरण क्षेत्रात ८२, वारणा चांदोली धरण परिसरात १६, दूधगंगा काळमवाडी धरण क्षेत्रात ८८ आणि कुंभी धरणक्षेत्रात १९० मिमी. पावसाची नोंद झाली आहे. सध्या वारणा धरणांमधून ११००  क्युसेक्स, काळम्मावाडी ४०० आणि कुंभी धरणांमधून ३००  क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. यामुळे जिल्ह्यातील १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

यामध्ये राशिवडे, हळदी, कोगे, खडक कोगे, शिंगणापूर,राजाराम बंधारा सुर्वे, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ,यवलुज,ठाणे, अळते, कळे हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत.