गारगोटी (प्रतिनिधी)  : भुदरगड तालुक्यात पावसाने अक्षरश:हा पावसाने थैमान घातले असून वेदगंगेच्या महापुराने नदिकाठावरील गावांत दहशत पसरली आहे. गारगोटी शहर व खानापूर गावाला बेटाचे स्वरुप आले आहे. तालुक्यातील कूर म्हसवे, दारवाड अशी अनेक गावे पुराच्या पाण्याने वेढली आहेत. अनेक घरांची पडझड  झाली आहे. शेणगावात अनेक घरात पाणी शिरले आहे. १० घरे जमिनदोस्त झाली आहेत. तर काही घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. अद्यापही पडझड सुरु आहे.

शेणगांवात निम्या बाजारपेठेत पाणी शिरले असून ख्रिश्चन समाजाची बारदेसकर गल्लीला पुर्णत: पाण्याने वेढा घातला आहे. रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी बाहेर काढण्यात आले आहे. अद्यापही पाऊस कमी येत नसल्याने चिंता व्यक्त केली आहे. भुदरगड तालुक्यात सर्वच रस्त्यावर पाणी आले आहे. नव्याने तयार केलेले व उंची वाढवलेले रस्ते पुंन्हा पाण्याखाली गेले आहेत. या महापुराने साऱ्यांचेच अंदाज चुकले आहेत. गारगोटी नाईकवाडी रस्ता रुंदीकरण व गरजेच्या ठिकाणी वाढवलेली उंचीही पाण्याखाली गेली आहे. शेणगांव पुलाची पुरेसी उंची वाढवूनही पुंन्हा हे पूल पाण्याखाली गेले तर कुंभारवाड्याच्या पुढील बाजूस नाईक, भोकरे सर यांच्या ठिकाणच्या उंची वाढवलेल्या पुलावर पाणी आले आहे. सातोसकर कारखान्यासमोरील पुलही पाण्याखाली गेला आहे. पुंन्हा नव्याने ही बांधकामे धरणे गरजेचे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. गारगोटी आकुर्डे मार्गावर उंचीवाढवलेल्या आरसीसी रस्त्यावरही पाणी आल्याने रस्ता बांधकामाचे सारेच अंदाज चुकले आहेत. सन २९१९ सालात आलेल्या महापुरापेक्षा सुमारे सहा फूट पाण्याची पातळी वाढल्याचे दिसून येत आहे. गारगोटी शेजारच्या पाल घाटात अतिवृष्टीमूळे दरड कोसळून रस्ताच बंद झाला आहे.

पाटगांव धरण ८४ टक्के भरले आहे. आज सकाळी यातून २०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.चिकोत्रा धरणही ८१ टक्के भरले असून या धरणातूनही १०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.त्यामूळे नदिकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.