पुणे  (प्रतिनिधी) : मराठवाड्यापासून दक्षिण तमिळनाडूच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागांत तुरळक ठिकाणी  आज (रविवार) पासून पुढील ५ दिवस ढगाळ वातावरण  निर्माण होणार आहे.  तर काही ठिकाणी वादळ, विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

सध्या राज्यात सर्वत्र कोरडे हवामान असून काही भागांत संध्याकाळी आकाश काहीसे ढगाळ होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात येत्या ४ दिवसांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भात सोमवारनंतर सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर कोकणातही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

दरम्यान, पुणे,  नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील बीड, परभणी, लातूर, हिंगोली, उस्मानाबाद, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पुढील ५ दिवस पाऊस पडण्याची  शक्यता आहे.