पुणे (प्रतिनिधी) : विदर्भ व मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह  येत्या ४ दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता  पुणे हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मध्य प्रदेशापासून उत्तर कर्नाटकापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचा  विस्तार दक्षिण तामिळनाडूपर्यंत झाला आहे. त्यामुळे पुढील चार दिवस विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला  आहे.

मराठवाड्यातील नांदेड,  लातूर,  उस्मानाबाद जिल्ह्यात २४ एप्रिलरोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दरम्यान, पुणे शहराचे तापमान कमी झाले असले, तरी रात्रीच्या तापमानात वाढ कायम आहे.  मंगळवारी सर्वाधिक कमाल तापमान चंद्रपूर येथे ४२.८ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान महाबळेश्वर येथे १८.१ अंश सेल्सिअस इतके होते. विदर्भात सध्या देशातील सर्वाधिक कमाल तापमानाची  नोंद झाली आहे.

दरम्यान,  स्कायमेट या संस्थेने राज्यात यंदा १०३ टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यावर्षी देखील सरासरी इतकाच पाऊस पडेल.  यंदा समाधानकारक पाऊस पडणार असल्याच्या बातमीने बळीराजा सुखावला आहे. यंदा तापमान जास्त असल्याने ते मान्सूनसाठी पोषक ठरणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.