मुंबई (प्रतिनिधी) : सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार बरसून विश्रांती घेतल्यानंतर रविवारपासून पुन्हा पाऊस जोरदार कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने आज (शुक्रवार) वर्तवला आहे. राज्यात पुन्हा एकदा विजांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

रविवारी (दि.१९) अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल. तर नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक अशा चारही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.   तर इतर ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. सोमवारी आणि मंगळवारी काही ठराविक ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध  राहत शेतीची कामे उरकून घ्यावीत, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. तर काही ठिकाणी खरीप पिकांसाठी पाऊस पोषक ठरल्याने शेतकरी सुखावला. त्यानंतर चार-पाच दिवसांपासून पावसाने काहीशी दडी मारल्यानंतर आता रविवारपासून पुन्हा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.