जिल्ह्यात शनिवारपर्यंत पाऊस

0
83

कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील बहुतांश भागात आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. जिल्ह्यात शुक्रवारी (दि.८) देखील काही ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. शनिवारपर्यंत जिल्ह्याच्या काही भागात पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

ऐन हिवाळ्यात जिल्ह्याच्या अनेक भागांत पाऊस पडत आहे. गेल्या सोमवारी देखील अवकाळी पाऊस पडला होता. दोन दिवसांपर्यंत शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस बरसला. पावसामुळे अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान, सकाळी धुके आणि त्यानंतर ढगाळ वातावरण होते.

कमी दाबाचा पट्टा दक्षिण मध्य अरबी समुद्र, दक्षिण कोकण, गोवा ते उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यांच्या बहुतांश भागात तर विदर्भातील तुरळक भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे. कोकण गोव्यातील बहुतांश भागात तापमानात किंचित वाढ झाली आहे. ८ जानेवारी रोजी कोकण गोव्यासह मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भातील तुरळक ठिकाणीही पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.