नागपूर  (प्रतिनिधी) : राज्यात थंडीमुळे जनजीवन गारठले असताना पुढील  दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि गारपिट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. २८ आणि २९ डिसेंबररोजी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर अमरावती, वर्धा, नागपूर आणि भंडारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर गोंदिया, औरंगाबाद आणि जालना या तीन जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. येत्या चोवीस तासांत संबंधित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता आहे. दरम्यान, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे  नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विजां कोसळण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.