रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांची कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट

0
71

कोल्हापूर (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी आज कोल्हापूर रेल्वे स्थानकाला भेट दिली. यावेळी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव यांनी त्यांची भेट घेऊन रेल्वे प्रवासी हिताच्या विविध मागण्या मांडल्या तसेच प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात चर्चा केली.

कोल्हापूरचे राजश्री शाहू महाराज टर्मिनस हे रेल्वे स्थानक सध्या ए ग्रेड दर्जाचे आहे. येथील सोयीसुविधा तसेच रेल्वे कामकाजाचा आढावा घेण्यासाठी श्री मित्तल यांनी येथे भेट दिली. आज सकाळी आठच्या सुमारास त्यांचे रेल्वेस्थानकावर आगमन झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर – मिरज मार्ग विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे तसेच रेल्वे स्थानकावर तीन फलाटांचे कामकाज सुरू आहे, प्रवाशांसाठी विश्रांती कक्ष सुरू झाला आहे तसेच अन्य पायाभूत सुविधा तयार होत आहेत त्याची माहिती घेतली. त्यासाठी रेल्वेस्थानकावर त्यांनी फेरफटका मारून या पायाभूत सुविधांची पाहणी केली.

यानंतर खासदार मंडलिक, खासदार माने व आमदार जाधव यांच्यासोबत चर्चाही केली. त्यावेळी मिरज कोल्हापूर मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून या मार्गावर पूर्णवेळ विद्युतीकरण केलेल्या गाड्यांमधून प्रवासी वाहतूक सुरू व्हावी तसेच बंद केलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू व्हाव्यात, बहुतांशी रेल्वेगाड्यांच्या वेळा व मार्ग  निश्चित करताना प्रवाशांच्या सूचनांचाही विचार व्हावा, आधी मागण्या लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या. रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे विविध मार्गावर रेल्वे गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. यात कोल्हापूर दिल्ली, कोल्हापूर अहमदाबाद, कोल्हापूर तिरुपती सोलापूर मार्गे, आदी मार्गांवर रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली. रेल्वे स्थानकाची इमारत १३५ वर्षे जुनी असून या इमारतीचे वैभव कायम ठेवून नव्या इमारतीची बांधणी करावी अशी मागणीही रेल्वे प्रवासी संघटनांच्या वतीने करण्यात आली.