गांधीनगरमध्ये बनावट लेबल लावून विक्री करणाऱ्या जीन्सच्या दुकानावर छापा…

0
846

करवीर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील गांधीनगर येथे मुख्य रस्त्यावर असणाऱ्या मचमोअर गारमेन्ट या दुकानात लेविस या कंपनीचे बनावट लेबल विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या ८ लाखांच्या बनावट जीन्स पॅन्ट आज (रविवार) जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी दुकानाचे मालक सुमित लक्ष्मणदास तलरेजा (वय २७, रा. गांधीनगर) यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. याबाबतची फिर्याद नेत्रिका कन्सल्टींगचे सुब्रमण्यम व्यंकटेश (वय ४२ ) बेंगलोर यांनी गांधीनगर पोलिसात दिली होती.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, व्यंकटेश यांना गांधीनगर येथील मचमोअर गारमेंट दुकानात लेविस कंपनीच्या लेबलखाली बनावट माल विक्री होत असल्याची माहीती मिळाली होती. यावेळी कॉपी राईट अॅक्टखाली या दुकानात धाड टाकली असता लेवीस इंजिनिअर्ड जीन्स, रेग्युलर लेव्ही स्ट्रॉस अँण्ड को या कंपन्यांचे बनावट लेबल प्रिंट करून  ही पँट लेविस कंपनीची असल्याचे भासवत होते. वेगवेगळ्या रंगाचे आणि  साईज असलेल्या ३२५ जीन्स पॅन्ट प्रत्येकी किंमत २,४९९ आहे. असा ८ लाखांचा माल सापडला.

याप्रकरणी कॉपीराइटचे नितीन कदम, प्रमोद मोकाशी, अविनाश पाटील यांनी कारवाई करत दुकान मालक सुमित लक्ष्मणदास तलरेजा यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.