शिंगणापुरातील जुगार अड्ड्यावर छापा : १२ जणांना अटक

0
100

कोल्हापूर (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथील एका मळ्यात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बारा जणांना अटक केली. जुगार खेळणाऱ्यांकडून पोलिसांनी रोख ९२ हजार, पाच दुचाकी आणि १३ मोबाईल असे ३ लाख २५ हजारांचे साहित्य जप्त केले. 

करवीर तालुक्यातील सिद्ध बटुकेश्वर मंदिरामागील पोर्लेकर मळ्यात प्रकाश निंबाळकर, सुरेश तिवले आणि महेश पोवार जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री या ठिकाणी छापा टाकला. जुगार खेळणाऱ्या दत्तात्रय काटकर, स्वप्नील पाटील, तानाजी पाटील, भिकाजी पाटील, सचिन कुंभार, राजाराम चौगुले, पांडुरंग पोवार, सुधीर पोवार, अनंत दंताळ, दिगंबर नरके यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून जुगारातील ९२ हजाराची रोकड, १३ मोबाईल संच आणि ५ दुचाकी असे ३ लाख २५ हजारांचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. या सर्व संशयितांना करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहाय्यक फौजदार निवास पोवार अधिक तपास करीत आहेत.