गारगोटी (प्रतिनिधी) : भुदरगड तालुक्यातील शेणगाव येथे जुगार अड्ड्यावर भुदरगड पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत १३ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर रोख रक्कम, मोबाईल, मोटार सायकली असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

शेणगांव येथे पत्यांच्या जुगार चालत असल्याची गोपनीय माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीसांनी शेतातील घरात छापा टाकला असता तिथे १३ लोक जुगार खेळताना मिळून आले. या सर्वांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १६ हजार ५०० रोख रक्कम, ४५ हजारांचे ११ मोबाईल, ३ लाख ६० हजारांच्या सहा मोटारसायकली असा एकूण साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मयेकर, पोलीस कर्मचारी सतीश पाटील, किरण पाटील, पो. कॉ. दत्तात्रय शिंदे, युवराज पाटील, विकास पाटील, बसरकर यांनी केली.