गगनबावडा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील दुर्गम व मागास असलेल्या गगनबावडा तालुक्यातील रूपणीवाडी (असळज) येथील राहुल गावकर यांची राज्य कर निरीक्षकपदी निवड झाली आहे. जिद्द व चिकाटीच्या जोरावर, संघर्षातून सामान्य शेतकरी पुत्राने मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे.

दुर्गम व मागास भागातून आजवर कोणीही अधिकारी झालेला नाही, हे एकच ध्येय ठेवून २०१८ साली पदवीचे शिक्षण पूर्ण करत असतानाच राहुल गावकर यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. सकाळी सहापासून रात्री बारापर्यंत अभ्यासात खंड पडू दिला नाही. सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहून आणि संध्याकाळपर्यंत फोन बंद आणि मित्र-मैत्रिणीची भेट त्यांनी बंद केली होती. २०१९ साली राज्यसेवा पूर्वपरीक्षेत यश मिळवले. त्यानंतर राज्यसेवेची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होत मुलाखतीसाठी पात्र ठरला, पण नशिबाने हुलकावणी दिली. पीएसआयला देखील मैदानी परीक्षेपर्यंत जाऊन तिथेही नशिबाने हुलकावणी दिली.

प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटीने अभ्यास केल्याने एसटीआयच्या मुख्य परीक्षेच्या पात्र यादीमध्ये नाव आले. नंतर पूर्वी आलेले अपयश विसरून जिद्दीच्या जोरावर मुख्य परीक्षेतील यशाला गवसणी घातली. जे कमवायचे ते कष्टातून कमवायचे आणि आई-वडिलांना अभिमान वाटेल असेच काम करुन दाखवायचे, या ध्येयाने पछाडलेल्या अग्निपंखाचे अखेर अंतिम यादीमध्ये नाव झळकले. आई-वडील, कुटुंबीय, नातेवाईक, मित्र-परिवारांच्या शुभेच्छा आणि जिद्दच्या जोरावर संघर्षातून एका सामान्य शेतकरी पुत्राचा धडपडत सुरू झालेला प्रवास आज असामान्य विशिष्ट टप्प्यावर पोहोचला आहे.

आयुष्यातील स्वप्नांना गरुड भरारीचे पंख जोडून संघर्षातून मिळवलेले यश, उत्साह, चिकाटी, सकारात्मक विचारसरणी आणि अविरत कार्यरत राहण्याची पद्धत माझ्यासारख्या तरुणाला ऊर्जा देणारी आहे. स्पर्धा परीक्षेतील अपयशापासून ते यशापर्यंत माझ्यासह अनेकांसाठी जीवनप्रवास आदर्शवत व प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया राहुल गावकर यांनी व्यक्त केली.