राहुल गांधींनी सेल्यूलर जेलमध्ये राहून दाखवावे : मुख्यमंत्री शिंदे

0
12

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे दैवत आहे. त्यांचा अपमान राहुल गांधी यांनी केला आहे. असे म्हणत राहुल गांधींनी एकदा तरी सेल्यूलर जेलमध्ये राहून यावे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. विधासभा अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना त्यांनी ही टीका केली आहे.

मोदी आडनावाबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरातमधील कोर्टाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने यासंबंधीत नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधी यांनी वारंवार सावरकरांचा अपमान केला आहे. आजही त्यांनी सावरकरांचा पुन्हा अपमाण केला. सावरकर हे केवळ महाराष्ट्राचे नाही तर संपूर्ण देशाचे दैवत आहे. त्यांनी मरण यातना भोगल्या, काळ्या पाण्याची जेल भोगली, त्यांना घाण्यावर जुंपण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी इतक्या हालअपेष्टा भोगल्या.

राहुल गांधी यांनी एकदा तरी सेल्यूलर जेलमध्ये राहून यावे, अर्धा तासच त्यांना त्या घाण्याला जुंपले तर त्यांना कळेल त्यांच्या यातना काय आहेत? त्यामुळे त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले, राहुल गांधींनी मोदी यांच्याविषयी जे वक्तव्य केले, त्याची शिक्षा त्यांना कोर्टाने दिली आहे. काँग्रेसने केलेल्या कायद्याप्रमाणेच त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिली आहे. याआधीही अनेकांना या काद्याप्रमाणे शिक्षा झाली आहे. त्यावेळी कोणी निदर्शने केली नाही. त्यांनी केवळ पंतप्रधानांचाच अपमान नाही केला तर समस्त ओबीसी समजाचा अपमान केला आहे. त्यामुळे त्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे, असेही ते म्हणाले.