बंगळुरू (वृत्तसंस्था) : कर्नाटकच्या विधान परिषदेमध्ये लोकशाही आणि संसदीय आदर्शांचे धिंडवडे काढण्यात आले. गोरक्षा कायद्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक होऊन एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार आज (मंगळवार) घडला. एवढ्यावरच न थांबता हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. खुर्च्या, कागदे अंगावर भिरकावण्यात आली. तर काँग्रेसच्या सभासदांनी थेट सभापतींच्या आसनापर्यंत धाव घेत सभापतींना त्यांच्या खुर्चीवरून उठवले.

या घटनेबाबत काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार प्रकाश राठोड यांनी सांगितले की, भाजप आणि जेडीएसने सभापतींना सभागृहाचे आदेश नसताना अवैधपणे खुर्चीवर बसवले. त्यामुळे सभागृहाचा अवमान झाला आहे. काँग्रेसने त्यांना  खुर्चीवरून खाली उतरण्यास सांगितले. मात्र त्यांनी नकार दिल्याने नाईलाजाने आम्हाला त्यांना खुर्चीवरून हटवावे लागले.