पेठवडगाव (प्रतिनिधी) : डिसेंबर महिना संपला तरी अद्याप थंडी पडली नाही. तर ढगाळ हवामानाचा फटका रब्बी पिकांना बसला असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पेठवडगाव परिसरात ऊसाचे पीक मोठ्या प्रमाणावर असून सध्या उसाचा हंगाम सुरू आहे.

परंतु ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची कमतरता आहे असे शेतकरी रब्बी हंगामावर अवलंबून असतात. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात थंडीला सुरुवात होते. शेतकरी हंगामासाठी गहू, शाळू तसेच उन्हाळी मक्का, भाजीपाला यांची लागवड करतात. परंतु, सध्या डिसेंबर संपला तरी म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. त्यामुळे गहू, हरभरा, भाजीपाल्यासारख्या पिकांना दमट हवामान आणि थंडी आवश्यक असते. परंतु, थंडीअभावी रब्बी  पिके पन्नास टक्के तरी हाती येतील का अशी शंका व्यक्त होत आहे.

यंदा परतीच्या पावसाने जोर झाल्यामुळे भात भुईमूग आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच अवकाळी पावसामुळे शेतामध्ये ओलावा शिल्लक राहिल्यामुळे रब्बी हंगाम उशिरा सुरू झाला. त्यानंतर शेतकऱ्यांनी थोड्याफार प्रमाणात गहू, हरभरा, कांदा अशा पिकांची लागवड केली असली तरी थंडी अभावी तसेच ढगाळ वातावरण यामुळे पिके पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.