पाचगांव (प्रतिनिधी) :  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्येष्ठांचे लसीकरण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आ. ऋतुराज पाटील यांच्या पुढाकारातून हे लसीकरण झाले. यामुळे वृद्धाश्रमातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

कोरोनाच्या काळात ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्रशासनानेही महत्त्व दिले आहे. त्यामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठांचे लसीकरण कोण करणार, कसे होणार, याबाबत वृद्धाश्रमातील प्रशासनासमोर प्रश्न उभा होता. याची माहिती आ. ऋतुराज पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना वस्तुस्थिती सांगितली. यानंतर आ. ऋतुराज पाटील यांनी  तातडीने कणेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला सूचना दिल्या.

त्यानंतर तेथील वैद्यकीय पथकाने थेट वृद्धाश्रमात येऊन सर्वांची रॅपिड अँटिजेन टेस्ट केली. यामध्ये पाच ज्येष्ठ नागरिक पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अलगिकरणात ठेवण्यात आले. सौम्य लक्षणे असल्याने त्यांना डॉक्टरांच्या सूचनेनुसार अलागिकरणात ठेऊन इतर ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित करण्यात आले. तर उर्वरित सर्व ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले.

शरद पाटोळे यांनी सांगितले की, पालकमंत्री सतेज पाटील आणि आ.ऋतुराज पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून ज्येष्ठ नागरिकांचे रॅपिड अँटिजेन टेस्ट तसेच  लसीकरण पूर्ण केल्याने हे ज्येष्ठ नागरिक सुरक्षित झाले आहेत. या ठिकाणी येऊन लसीकरण केल्याबद्दल त्यांनी  वैद्यकीय पथकाचे आभार मानले. यासाठी प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी समन्वय साधून हे लसीकरण पूर्ण  केल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक शिवाजीराव पाटोळे, अॅड. शरद पाटोळे, रोहन पाटोळे, अवधूत पाटोळे, पाचगांवचे ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.