मुंबई (प्रतिनिधी) : पूजा चव्हाण प्रकरणात नाव आल्यानंतर राज्याचे वनमंत्री आणि शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला  होता. परंतु त्यांचा राजीनामा अद्याप राज्यपालांकडे पोहोचलाचं नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राठोड यांच्या राजीनाम्याचे पुढे काय होणार ?  राठोड अजूनही मंत्रीपदी कसे?  असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

बीडमधील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाशी वनमंत्री संजय राठोड यांचा संबंध असल्याचा आरोप करून भाजपने त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. तसेच अधिवेशन चालू न देण्याचा इशाराही दिला होता. अखेर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते.

राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनाम्यावर कार्यवाही होईल. राजीनामा फ्रेम करुन लावण्यासाठी घेतलेला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले  होते. मात्र, राजीनामा घेऊन दोन-तीन दिवस झाले, तरीही संजय राठोड मंत्रीपदी कायम आहेत. त्यांचा राजीनामा अजूनही राज्यपालांकडे पाठवलेला नाही. त्यामुळे राजीनाम्याचे पुढे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.