मुंबई (प्रतिनिधी) : पोलिसांनी सत्तेची दलाली करू नये. एवढीच हिंमत असेल तर दोन तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी वन बाय वन भिडा. तेव्हा आम्ही दाखवतो की महाराष्ट्र सैनिक काय असतो, अशा शब्दांत एक व्हिडिओ शेअर करत  मनसे नेते संदीप देशपांडे  यांनी पोलिसांना जाहीर आव्हान दिले आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते  वसईमध्ये परिवहन सेवेचे  उद्घाटन करण्यात आले.  यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्त साहेब वेळ द्या,  अशी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर  पोलिसांनी  कार्यकर्त्यांना मारहाण करून बाहेर काढले होते. यावर देशपांडे यांनी संताप व्यक्त करत जाहीर आव्हान दिले आहे.

देशपांडे म्हणाले  की, ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारले त्याच हातांनी सलाम करायला लावू.  पोलीस आमच्या महाराष्ट्र सैनिकांना आई-बहिणीवरून शिव्या देत होते. पोलिसांनी सरकारचे दलाल असल्यासारखं वागू नये.  सत्ता येते आणि जाते. पोलिसांनी पोलिसांसारखे काम केले पाहिजे. त्या ठिकाणी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि कार्यकर्त्यांना कानशिलातही लगावली. पोलिसांवर हात उचलू नये याची आम्हाला शिकवण असल्याने आम्ही या गोष्टी सहन करत आहोत, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.