राणेंच्या अभिवादनानंतर शिवसेनेकडून बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाचं शुद्धीकरण : भाजप संतप्त

0
250

मुंबई (प्रतिनिधी) : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आजपासून मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. त्यांनी मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन केलं होतं. मात्र, नारायण राणे या ठिकाणाहून निघून गेल्यानंतर तिथे शिवसेना कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळाचं दूध, गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं आहे. यावरून भाजप नेते संतप्त झाले असून खरे तर शिवसेनेचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे, अशी टीका आ. आशिष शेलार यांनी केली आहे.  

बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळाचे केअर टेकर आप्पा पाटील यांनी स्मृतिस्थळावर आधी दुग्धाभिषेक, त्यानंतर गोमूत्राने शुद्धीकरण केले. त्यानंतर तिथे फुलं वाहण्यात आली आहेत. नारायण राणे इथे आल्याने ही जागा अपवित्र झाली आहे. त्यासाठी हे शुद्धीकरण केल्याचं आप्पा पाटील यांनी सांगितले. त्या वेळी त्यांच्यासोबत काही स्थानिक शिवसैनिक उपस्थित होते.

शिवसेनेच्या या कृतीवर भाजप नेते आशिष शेलार यांनी खरमरीत टीका केली आहे. राज्याच्या संस्कृतीची ही विदारक स्थिती आहे. मुळात ती जागा कुणाची खासगी जागा नाही, मुंबई महापालिकेची आहे, त्यामुळे तिथे कुणीही जाऊ शकतं. आपल्या वडिलांच्या विचारांना आणि प्रेरणेला बगल देऊन सत्तेत जायचं, बाळासाहेबांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेत बसणाऱ्या शिवसेनेचंच शुद्धीकरण करण्याची वेळ आलीय. त्यामुळे  शिवसेनेचं शुद्धीकरण करावं लागेल. त्यामुळे शुद्धीकरणाची नौटंकी करु नये, असे त्यांनी म्हटले आहे.