मुंबई (प्रतिनिधी) : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) मुंबईत  वाशी शाखेच्‍या शेजारील ६ लाख क्षमतेच्‍या नवीन जागेत नवीन पॅकिंग सेंटर व स्‍टोअरेज उभारणार आहे. त्यासाठी या जागेचा खरेदी दस्तावेज व भूमिपूजन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, बाबासाहेब चौगले यांच्या उपस्थितीत आज (गुरूवार) वाशी येथे पार पडले.

विश्‍वास पाटील म्‍हणाले की, वाशी येथील दुग्‍धशाळेची पॅकिंग क्षमता अपूरी पडत आहे. त्यामुळे वाशी दुग्‍धशाळेच्‍या जवळपास संघाची स्‍वतःची पॅकिंग यंत्रणा उभी करण्‍यासाठी जागा उपलब्‍ध करून ती खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मे.दालचा फूड प्रोसेसिंग प्रा.लि यांची जागा संघाच्‍या वाशी दुग्‍धशाळेस लागून आहे. ती खरेदी करण्यात आली. त्यामुळे आता संघाचे सध्‍याचे पॅ‍‍किंग युनिट व नवीन प्रस्‍तावित कोल्‍ड स्‍टोअरेज असे मिळून ११ ते १२ लाख प्रतिदिन दूधाचे पॅकिंग व वितरण करता येणार आहे.

स्‍व. आनंदराव पाटील –चुयेकर यांनी १९९६ साली मुंबई येथे पहिल्‍यांदा जागा खरेदी केली होती. तेव्‍हा त्यांच्याबरोबर होतो. तसेच आज संघाला २०२१ मध्ये नवीन जागा खरेदी करीत असताना संघाचा चेअरमन म्‍हणून काम करत असताना मला आनंद होत आहे. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, संचालक मंडळ, दूध उत्पादक यांच्या पाठबळामुळेच हे शक्‍य झाले आहे, असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी ज्येष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील- चुयेकर, बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी. व्‍ही. घाणेकर, वाशी शाखेचे व्‍यवस्‍थापक दयानंद पाटील, रामकृष्‍ण पाटील, पृथ्‍वीराज पाटील, संघाचे अधिकारी आदी उपस्थित होते.