नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिल्यानंतर आता  पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे.  त्यामुळे पंजाब काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे.

तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरूवात होते. मी पंजाबचे भवितव्य व पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असे सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना  पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, सिद्धू यांनी राजीनामा दिलेला असला, तरी देखील त्यांनी आपण काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग आणि पंजाब प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादामुळे पंजाबाचे राजकारण ढवळून निघाले होते.  या दोघांमध्ये सामंजस्य झाल्याचेही सांगितले जात होते.  अखेर या दोघांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने राज्याचे राजकरणाला कोणते वळण मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.