चंदीगड (वृत्तसंस्था) : पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज (शनिवार) दुपारी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्याकडे दिला. त्यामुळे पंजाबमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस पक्षातील गटांतर्गंत कुरघोडीमुळे अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिल्याने आता नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करताना पक्षाच्या वरिष्ठांसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.   

राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी बोलताना कॅप्टन अमरिंदर सिंह म्हणाले की,   पक्षात अपमानजनक वागणूक देण्यात आली. आज सकाळीच काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून संवाद साधून माझा हा निर्णय त्यांना कळवला होता. मला अपमानजनक वागणूक देऊन माझ्या नेतृत्वावर शंका घेण्यात आली. दोन महिन्यांत तीन वेळा संवाद न साधता नेतृत्वाकडून थेट विधिमंडळ दलाची बैठक बोलावली. आता मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी ज्यांच्यावर विश्वास असेल त्यांच्यावर सोपवावी, असे ते म्हणाले.