कुरुंदवाड (प्रतिनिधी) : कुरुंदवाड शहरात आज (सोमवार) पासून मुख्याधिकारी निखिल जाधव आणि कुरुंदवाड पोलीस स्टेशनचे सपोनि. अमित पाटील यांनी कर्मचाऱ्यांना घेऊन शहरातील चौकात विनामास्क फिरणाऱ्यांना अडवून पाचशे रुपये दंड ठोठावण्यात सुरुवात केली. त्यामुळे कुरुंदवाड आणि परिसरातील विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्यात खळबळ उडाली.

गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे प्रशासनाकडून आवाहन करत होते. काही महाविद्यालयीन युवक-युवती आणि नागरिकही विना मास्क फिरताना आणि गर्दी करताना दिसून आले. कुरुंदवाड शहरात प्रवेश करणाऱ्या प्रमुख रस्त्यांसह, नगरपालिका चौक, सन्मित्र चौक, वंदे मातरम चौक, थिएटर चौक, भैरववाडी, काळाराम मंदिर आदी ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांना आडवून पाचशे रुपये दंड ठोठावण्यात येत होते.

प्रशासनाकडून अचानक राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे शेतमजूर आणि शेतकऱ्यांना याचा फटका बसत होता. अचानक झालेल्या या प्रकारामुळे शहर आणि परिसरातून काही ठिकाणी संताप तर काही ठिकाणी समाधान व्यक्त होत होते.