कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिका, केएमटी आणि पोलीस पथकाकडून २०१ लोकांकडून ३४ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र, शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली.  

केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे, शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरिकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ, धार्मिक स्थळे, भाजी मार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाइजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.