कृषी विधेयकांविरोधात पुणे- बेंगलोर महामार्ग रोखला ; कार्यकर्ते- पोलिसांत धक्काबुक्की (व्हिडिओ)  

0
56

टोप (प्रतिनिधी) : मोदी सरकारने केलेल्या शेतकरीविरोधी कृषी विधेयकांविरोधात  अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल येथे आज (गुरूवार) रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेवून नंतर सोडण्यात आले. दरम्यान, या कायद्याविरोधात २६ नोव्हेंबरला भारत बंदची हाक देण्यात आली आहे.

भाकप जिल्हा सहसेक्रेटरी गिरीश फोंडे म्हणाले की, केंद्राची कृषी विधेयके ही शेतकरीविरोधी आहेत. बाजार समित्या बरखास्त करुन अदानी, अंबानीला कमी किमतीत शेतीमाल ताब्यात द्यायचा. शेतीचे कॉर्पोरेटीकरण कंत्राटी शेतीच्या माध्यमातून करायचे आहे. शेतीमाल हमीभावाचा कायदा करणे गरजेचे असताना सरकारने या कृषी विधेयकातील उलटी पावले टाकली आहेत.

‘शेती बचाव, देश बचाव’, नवीन कृषी विधेयके हाणून पाडा, शेतकरी विरोधी मोदी सरकारचा धिक्कार असो, शेतीचे खासगीकरण होऊ देणार नाही, सहकार बचाव देश बचाव, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, कार्यकर्त्यांनी अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

यावेळी संजय चौगुले, बाबुराव कदम, संपत पोवार, संभाजी जगदाळे, प्रशांत आंबी, महेश पांडव, अमोल चंद्रकांत होनकांबळे, राजेंद्र पाटील, सुनंदा शिंदे, राजू देसाई, निखिल चव्हाण, हरीश कांबळे, अण्णा मगदूम, प्रदीप फोंडे, दिलदार मुजावर, बंडू पाटील, अरुण शेंडगे, आरती रेडेकर, कुमार जाधव, मासाई पखाले यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, जनता दल (सेक्‍युलर) अ.भा.किसान सभा, आम आदमी पार्टी, यासह विविध संघटना आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.