धामणी खोऱ्यातील नुकसानग्रस्त शेतींचे त्वरीत पंचनामे करावेत : शेतकऱ्यांची मागणी

0
81

कळे (प्रतिनिधी) :  पन्हाळा तालुक्यातील धामणी खोऱ्यामध्ये सावर्डे, आंबर्डे, पणुत्रे, हरपवडे, निवाचीवाडी या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे डोंगरांचे भूस्खलन होऊन  शेकडो एकर जमीनीवरील पिके गाडली गेली आहेत. त्यामुळे येथील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

पन्हाळा तालुक्याचे शेवटचे टोक असणाऱ्या हरपवडे आणि निवाचीवाडी येथे भूस्खलन होऊन शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. हरपवडे येथील गुरव नाळव्यामध्ये शेतात डोंगर आरून तो गाळ ओढ्यातून गावंदरीच्या शेतात जाऊन सुमारे दहा एकरातील शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. निवाचीवाडी येथेही सुमारे दहा एकर डोंगराचे भूस्खलन होऊन ऊस,भात,भुईमूग, नाचना आदी पिकांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आंबर्डे येथे डोंगराचे भूस्खलन होऊन  परिसरातील सुमारे पाच एकरातील भात व ऊस शेती माती, दगड व चिखलाखाली गाडली गेली. पणुत्रे इथे वाघजाई डोंगर परिसरात भूस्खलन होऊन सर्वत्र दगड माती व चिखलाचा थर झाला आहे. सावर्डे येथे डोंगराचे भूस्खलन होऊन परिसरातील तीन एकराचे तसेच मल्हारपेठेतील पाणी पुरवठा पाईपलाईनचे नुकसान झाले आहे.

तरी यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून महसूल विभागाने तातडीने पंचनामे करावेत. आणि शासनाने झालेली नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.