कोल्हापूर (प्रतिनिधी) : सूक्ष्म,  लघु व मध्यम उद्योजकांच्या कथा आणि व्यथा या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आज (सोमवार) पार पडला. ज्येष्ठ अर्थतज्ञ व साहित्यिक प्राचार्य जे. के. पवार यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

कोल्हापुरातील शुभंकर पब्लिकेशन्स प्रा. लि. या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेल्या या पुस्तकामध्ये लेखक संजय कात्रे यांनी त्यांच्या ३७ वर्षातील बँकिंगच्या अनुभवातून सुमारे २२ उद्योजकांच्या सत्यकथा वर्णन केल्या आहेत. यातून अनेक नवीन उद्योजक बोध घेतील व सशक्त उद्योग उभे राहायला मदत मिळेल, असे प्रतिपादन प्राचार्य जे. के. पवार यांनी केले.

या पुस्तकातून फक्त उद्योजकच नाही, तर बँकिंग क्षेत्रामध्ये काम करत असणाऱ्या विविध विभागातील  अधिकारी व कर्मचारी यांना खूप काही शिकायला मिळेल, असे प्रतिपादन बँक ऑफ इंडियाचे झोनल मॅनेजर हेमंत खेर यांनी केले.  यावेळी लेखक संजय कात्रे यांची डॉ. प्रिया अमोद यांनी मुलाखत घेतली. ही मुलाखत युट्युब चॅनेलवर प्रसारित केली जाणार आहे.

या कार्यक्रमाला विविध स्तरांतील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत डॉ. सुनिल पाटील यांनी केले.  सूत्रसंचालन अमित बोडके यांनी केले. डॉ. ऋषिकेश जाधव यांनी आभार मानले.