टोप (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील सहकारी संस्थांमधील होणारे बदल आणि धोरणात्मक परिवर्तन याचा आढावा ‘सहकारी जगत’ या विशेषांकाच्या माध्यमातून सहकार चळवळीसमोर येत आहे, असे प्रतिपादन वारणा सहकारी बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे यांनी केले.

वारणानगर येथे पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघ यांच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘सहकारी जगत’ या विशेषांकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पश्चिम महाराष्ट्र प्रादेशिक सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ.प्रताप पाटील  होते.

निपुण कोरे म्हणाले की, बदलत्या धोरणानुसार सहकारांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होऊ लागले आहे. सहकारामध्ये सामान्य माणसांचे स्थान कमी होत असून याला जबाबदार सरकारी यंत्रणा आहे. अनेक वर्षांपासून सहकार व सहकारी संस्थांची असलेली परंपरा ही सध्याच्या धोरणात्मक निर्णयामुळे खिळखिळी होण्याची भीती निर्माण झाली आहे.

डॉ. प्रताप पाटील म्हणाले की, ‘सहकारी जगत’ च्या अंकातून सहकारातील विविध विषयांची हाताळणी केली जाते. त्या माध्यमातून सहकाराबद्दलचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. सुरज चौगुले यांनी केले. यावेळी वारणा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद कोरे, वारणा शिक्षण संस्थेचे विश्वस्त बाबासो पाटील, वारणा सहकारी बँकेचे संचालक व वारणा महाविद्यालयातील सर्व सहाय्यक प्राध्यापक उपस्थित होते. डॉ.भारत उपाध्ये यांनी आभार मानले.