नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तमिळनाडूतील श्री पेरुम्बुदूर येथे २१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एलटीटीईच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला घडवून हत्या केली होती. वास्तविक, त्यांच्या हत्येचा कट रचला गेल्याची पूर्वसूचना एक वर्षापूर्वी मिळाली होती, मात्र तत्कालीन द्रमुक सरकारने तमिळींच्या मतांसाठी याकडे साफ दुर्लक्ष केले आणि गांधी यांच्या हत्येचा तपास गांभीर्याने केला नाही, असा आरोप राजीव गांधी हत्या प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी अमोद कंठ यांनी केला आहे. द्रमुकने मात्र हा आरोप फेटाळला आहे.

अमोद कंठ यांनी ‘खाकी इन डस्ट स्टॉर्म’ नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. या पुस्तकातून त्यांनी दावा केला की, लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम (एलटीटीई) बद्दल सहानुभूती बाळगणाऱ्यांनी तामिळ मतदारांच्या समाधानासाठी या पुराव्यांकडे दुर्लक्ष केलं. राजीव गांधींच्या हत्येपूर्वी एक वर्षापूर्वी सर्व पुरावे मिळाले होते. एलटीटीई मोठ्या हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली होती. राजीव गांधी आणि श्रीलंकन तमिळ नेत्याची १२ सहकाऱ्यांसह १५ जून १९९० मध्ये हत्या झाली होती. विशेष हे आहे की, राजीव गांधी आणि तामिळ नेत्याच्या हत्येमध्ये एकच पद्धत वापरली होती. पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र, याप्रकरणी काहीही केलं गेलं नाही.

डीएमकेचे खासदार आणि प्रवक्ते टीकेएस एलनगोवन यांनी कंठ यांचा दावा फेटाळून लावताना म्हटलं की, आम्ही राजीव गांधी सरकारवर १३ वी घटनादुरुस्ती लागू करण्यासाठी दबाव टाकला होता. जेव्हा श्रीलंकेत भारतीय शांतीसेना पाठवण्यात आली, तेव्हा तिथं तामिळींच्या हत्या करण्यात येत होत्या. तमिळींवर होत असलेल्या अत्याचारांविरोधात करुणानिधी यांनी राजीव गांधींचे स्वागत करण्यास नकार दिला होता.”