इचलकरंजी (प्रतिनिधी) : नगरपालिकेने शहरातील दिव्यांगांना अनुदान देण्यासाठी १ कोटी ७० लाखाची तरतूद केली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५१० लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर सुमारे ५५ लाख ७० हजारांची रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिली.

अलका स्वामी म्हणाल्या की, शहरात एकूण १५७० दिव्यांग लाभार्थ्यांचे मागणी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील ५१० लाभार्थ्यांच्या बॅँक खात्यावर रक्कम जमा करण्यात आली आहे. ५४० लाभार्थ्यांचे लेखापरीक्षण आणि ५२० लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण होईल त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने लाभार्थ्यांच्या खात्यावरही रक्कम जमा करण्यात येणार आहे.

त्यासाठी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, महिला व बाल कल्याण सभापती सारीका पाटील, बांधकाम सभापती उदयसिंग पाटील, पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, मागसवर्गीय कल्याण सभापती संध्या बनसोडे यांच्यासह पक्षप्रतोद, नगरसेवकांचे सहकार्य लाभल्याचे स्वामी यांनी सांगितले.