कोल्हापूर (प्रतिनिधी) : गांधी मैदान, बावडा आणि दुधाळी पॅव्हेलियन या मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी १८ कोटी रुपयांच्या निधीची मागणी आमदार चंद्रकांत जाधव यांनी क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन आज (मंगळवार) मंत्रालयात दिले. यावेळी मंत्री केदार यांनी कोल्हापुरातील मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की, देशाच्या विविध भागातील खेळाडू कोल्हापूरमध्ये सरावासाठी येतात. कुस्ती, फुटबॉल, जलतरण, नेमबाजी, हॉकी, बास्केटबॉल, स्फॉटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, वेटलिफ्टिंग, शरीरसौष्ठव, रबी, तलवारबाजी, मैदानी स्पर्धा ( अॅथलटीक्स) अशा सर्व क्रीडा प्रकारात कोल्हापूर राज्य, देशासह जगात चमकले आहे. क्रीडा प्रशिक्षण, क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा व्यवस्थापन आणि आधुनिक क्रीडा सुविधा खेळाडूंना मैदानावर उपलब्ध झाल्यास  कसून सराव करता येईल. त्यामुळे तिन्ही मैदानात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याकरीता प्रत्येक मैदानास ६ कोटी प्रमाणे १८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा, अशी मागणी आमदार जाधव यांनी केली.

खेळाडूंना सरावासाठी उत्तम सुविधा मिळाल्या, तर कोल्हापूरचा खेळाडू जागतिक स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतो. यामुळेच मैदानाच्या विकासासाठी सरकारकडे निधीची मागणी केली असून मंत्री केदार यांनी निधी देण्याचे आश्वासन दिल्याचे आ. जाधव यांनी सांगितले.