मोकाट गायींचे संगोपन करण्यासाठी सोयीसुविधा देऊ : नगराध्यक्षा अलका स्वामी

0
75

इचलकरंजी (प्रतिनिधी) : शहरातील मुख्य वर्दळीच्या ठिकाणची मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही केली जाईल. त्याचबरोबर मोकाट गायींचे संगोपन करण्यासाठी जबाबदारी स्वीकारणाऱ्या सेवाभावी संस्थांना पुरेशी जागा आणि आवश्यक त्या सोयी सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी दिली.

इचलकरंजी पालिकेच्या सभागृहात आज (शुक्रवारी) वाहतूक सिग्नल दुरुस्ती, मोकाट जनावरे व भटकी कुत्री बंदोबस्त आणि साईन बोर्ड यासंदर्भात कार्यवाही करण्यासाठी पोलीस ठाणे, शहर वाहतूक नियंत्रण कक्ष आणि सेवाभावी संस्थांच्या आयोजित बैठकीत त्या मार्गदर्शन करताना बोलत होत्या.

या बैठकीत उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, आरोग्य समिती सभापती संजय केंगार यांनी मोकाट जनावरे, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त आणि वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणे, फुटपाथवरील अतिक्रमण हटवणे आणि मोकाट गायी पकडून त्यांचे योग्य संगोपन होण्यासाठी जागा व मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करु ,अशी ग्वाही  दिली.

या बैठकीला महिला व बाल कल्याण समिती सभापती सारिका पाटील, नगरसेवक प्रकाश मोरबाळे, राजू बोंद्रे, अब्राहम आवळे, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, शहर वाहतूक नियंत्रण कक्षाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, इचलकरंजी पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार, सामाजिक कार्यकर्ते अभिजीत पटवा, शिवजी व्यास, भाऊसो आवळे, सतीश मुळीक, पवन तिबडेवाल, सनतकुमार दायमा, सचिन बेलेकर यांच्यासह पालिकेचे अधिकारी, गो शाळा संस्थाचालक व नागरिक उपस्थित होते.