मुंबई (प्रतिनिधी) : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जमीन खरेदी व्यवहार केल्याचा आरोप निराधार आहे. असे काही व्यवहार झाले असतील, तर सोमय्यांनी सिद्ध करावे, असे आव्हान शिवसेना नेते रविंद्र वायकर यांनी दिले आहे. तसेच या आरोपाबाबत सोमय्यांना कायदेशीर मार्गाने उत्तर देणार असून अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचे वायकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, रविंद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर आणि अन्वय नाईक यांच्यामध्ये ३० व्यवहार झाल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला आहे. यावर वायकर यांनी सोमय्या यांना प्रत्युत्तर दिले आहे.

अन्वय नाईक यांच्या कुटुंबियांसोबत झालेला व्यवहार पूर्णतः कायदेशीर मार्गाने झालेला आहे. याची नोंदही आम्ही निवडणूक प्रतिज्ञापत्रात केली आहे. आयकर विभागालाही याची माहिती असल्याचे वायकर यांनी सांगितले. मराठी माणसाने कोकणात कायदेशीर मार्गाने जमिनी घ्यायच्या की नाहीत ? की फक्त परप्रांतीयांनी घ्यायच्या ? असा प्रश्न वायकरांनी उपस्थित केला. ३० व्यवहार अजिबात झालेले नाहीत, झाले असतील तर सिद्ध करावेत. बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, असेही वायकर यांनी म्हटले आहे.