कृषी कायद्याविरोधातील निदर्शने शेतकऱ्यांची नव्हे, दलालांची..!

आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांची टीका

0
168

पन्हाळा (प्रतिनिधी) : नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने ही शेतकऱ्यांची नसून मूठभर दलालांची आहेत महाराष्ट्रातील काही नेते शेतकऱ्यांना कृषी कायद्यांबाबत चुकीची माहिती देत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र येथील शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद न दिल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याची टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आ. सदाभाऊ खोत, आ. गोपीचंद पडळकर यांनी केली. ते आज (शनिवार) पन्हाळा येथे बोलत होते.

केंद्र सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्याच्या समर्थनार्थ रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत व भारतीय जनता किसान मोर्चा यांनी किसान आत्मनिर्भर यात्रेचे आयोजन केले आहे. ही यात्रा काल पन्हाळा येथे पोहोचली. आज सकाळी आ. खोत, आ. पडळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या पादुकांना वंदन करून यात्रेला सुरुवात केली. त्यानंतर वीर शिवा काशीद यांच्या समाधीचे दर्शन घेऊन व तेथील लोकांची या विधेयकाबद्दलची मतं जाणून घेतली. यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

ते म्हणाले की, दलालांच्या जोखडातून मुक्त करणारेच शेतकरी हिताचे कायदे मोदी सरकारने आणले आहेत. मागील ७० वर्षे काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांचे व शेती हिताचे कायदे आणले नाहीत त्यामुळे किमान पाच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आता नवे कायदे जोखडातून मुक्त करणारेच शेतकरी हिताचे मोदी सरकारने आणले आहेत. या कायद्यांमुळे शरद जोशींसारख्या नेत्याच्या आत्म्याला शांती लाभणार आहे. शेतकरी हिताचे असूनही या कायद्यांना विरोध होत आहे हे दुर्दैव आहे. नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या बांधावरच योग्य दर मिळणार आहे शेतकरी आपल्या मालाची कोठेही विक्री करू शकणार आहेत.

या वेळी भगवान काटे, अमरसिंह भोसले, अविनाश चरणकर, सचिन शिपुगडे, नगराध्यक्षा रुपाली धडेल, माधवी भोसले, इंद्रायणी अडनाईक, अनुप गवंडी, मनोज नाखरे, सुभाष गवळी, अमृत गुळवणी, नितीन बहादुरे, शुभम आडके आणि कार्यकर्ते उपस्थित होते.