चंदगडमध्ये आंदोलनकर्त्याला मारहाण : बीडीओंसह ११ जणांविरुद्ध फिर्याद

0
97

चंदगड (प्रतिनिधी) : चंदगड पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणाऱ्यास पाठलाग करून दोघांनी आसगाव फाट्याजवळ बेदम मारहाण केली. रमाकांत लक्ष्‍मण गावडे (वय ३९ रा. हेरे ता. चंदगड) असे जखमीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांनी अज्ञात दोघांविरुद्ध चंदगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तसेच ही मारहाण चंदगडचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोरडे यांचेसह पंकज तेलंग, अप्पाजी गावडे, चंद्रकांत पाटकर, विशाल बल्लाळ, नारायण कांबळे (सर्व रा. हेरे), मारुती गावडे (रा. खामदाळे) संजय सावंत, शंकर चव्हाण यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

चंदगड तालुक्यातील हेरे येथे राहणारे रमाकांत गावडे हे पोल्ट्री व्यावसायिक आहेत. काही मागण्यांसाठी त्यांनी १६ ऑक्टोबरपासून चंदगड पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. बुधवारी सायंकाळी गावडे हे त्यांच्या मोटरसायकलवरून हेरे गावाकडे जात होते. ते आसगाव फाट्याजवळील पोल्ट्रीजवळ आले असता त्यांच्या मागून पाठलाग करत आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले व पुन्हा यापुढे आंदोलन केल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी देत गावडे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात गावडे जखमी झाले. याप्रकरणी त्यांनी चंदगड पोलीस ठाण्यामध्ये अनोळखी दोघांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. तसेच चंदगडचे गटविकास अधिकारी चंद्रकांत बोरडे यांचेसह इतर नऊजणांच्या सांगण्यावरून ही मारहाण करण्यात आल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

गावडे यांच्यावर चंदगड येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत.