वाढीव मानधनासह विविध मागण्यांसाठी आशा स्वयंसेविकांची महापालिकेसमोर निदर्शने

0
674

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांचे वाढीव मानधन कपात, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता यासह इतर प्रलंबित प्रश्न व मागण्या संदर्भात कोल्हापूर जिल्हा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन यांच्यावतीने महापालिकेच्या दारात आज (सोमवार) निदर्शने करण्यात आली.

कोल्हापुरात सुमारे २२० आशा स्वयंसेविका काम करतात. या सर्वांनी कोरोनाच्या काळात घरोघरी जाऊन जोखमीचे काम केले आहे. असे असतानाही शासनाकडून आशा सेविकांना मिळणारे मानधन आणि भत्ता प्रलंबित आहे. या मागण्यासाठी आज आशा सेविकांनी महापालिकेच्या दारात जोरदार निदर्शने केली. वाढीव मानधन कपात, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता, माझे कुटुंब माझी जबाबदारी दुसऱ्या फेरीचे मानधन, टी.बी. व कुष्ठरोग सर्व्हेचा भत्ता, डेंग्यू सर्व्हेचे मानधन, पदवीधर मतदान मानधन, स्टेशनरी खर्च, गट प्रवर्तक भरती यासह विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

पुढील आठवड्यात महापालिकेतील संबंधित खात्याचे सर्व अधिकारी आणि आशा वर्कर्स युनियनचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेण्यात येईल. या बैठकीमध्ये स्थानिक प्रश्नावर चर्चा करून सोडविले जातील आणि राज्यस्तरावरील प्रश्नासाठी राज्य शासनाला लेखी कळविले जाईल असे आश्वासन आयुक्त बलकवडे यांनी शिष्टमंडळाला दिले. यावेळी जिल्हाध्यक्षा नेत्रदिपा पाटील, जनरल सेक्रेटरी उज्वला पाटील, शहराध्यक्षा ज्योती तावरे, चंद्रकांत यादव, नीलम कांबळे, मेघा पोवार यासह आशा सेविका आणि गट प्रवर्तक उपस्थित होते.