कोल्हापूर (प्रतिनिधी) : आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे पुण्याचे केदार ढमाले आणि कोल्हापूर आप रिक्षा संघटनेचे पदाधिकारी यांनी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संतोष काटकर यांना निवेदन देऊन रिक्षा टाकी पासिंग करताना ‘बीटी’ फॉर्मचे ७५० रुपये भरून घेऊ नये. तसेच ‘बीटी’ फॉर्म लवकरात लवकर रद्द न केल्यास आंदोलन उभारण्याचा इशाराही आम आदमी रिक्षा संघटनेतर्फे देण्यात आला.

‘बीटी’ फॉर्म हा महाराष्ट्रात फक्त कोल्हापूरमध्येच चुकीच्या पद्धतीने भरून घेतला जातो, असे ढमाले यांनी सांगितले. ज्या वेळेस रिक्षाला अपघात होतो त्या वेळेस चासी, इंजिन, गॅस टाकी बदलावी लागल्यास ‘बीटी’ फॉर्म लागू होतो; मात्र कोणत्याही तपासणीकरिता ‘बीटी’ फॉर्म लागू होत नाही, ही बाब काटकर यांना प्रादेशिक अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली. ही बाब तपासून त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करू व तसे आदेश कर्मचाऱ्यांना देऊ, असे आश्वासन प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

या वेळेस संघटनेचे अध्यक्ष राकेश गायकवाड, सचिव बाबूराव बाजारी, खजिनदार मंगेश मोहिते, संघटक विजय भोसले, सदस्य शकील मोमीन आणि संजय नलवडे उपस्थित होते.