प्रस्तावित घरफाळा, पाणीपट्टी वाढ रद्द करावी : कृती समितीचे निवेदन

0
55

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महापालिकेची प्रस्तावित घरफाळा आणि पाणीपट्टी वाढ रद्द करावी अशा मागणीचे निवेदन आज (बुधवार) ‘वीज बिल भरणार नाही कृती समिती’च्या वतीने प्रशासक कादंबरी बलकवडे यांना देण्यात आले. हे निवेदन अॅड. बाबा इंदुलकर,निवास साळोखे, बाबा पार्टे, सुभाष जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महापालिका प्रशासनाचे नियोजन चुकल्यामुळे महानगरपालिका आर्थिक अरिष्टात सापडली आहे. आणि आर्थिक तूट भरून काढण्याच्या नावावर नागरीकांचा घरफाळा आणि पाणीपट्टी भरमसाठ वाढवण्याचे धोरण अवलंबले आहे. या घरफाळा आणि पाणीपट्टी वाढीला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. शहरातील पाण्याचे  नियोजन फसले आहे. शुद्ध पाणी मिळतच नाही तसेच समान पाणी वाटप होत नाही. भ्रष्टाचाराने मलिन झालेली थेट पाईप लाईन कधी पूर्ण होणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

याबरोबरच शहर आणि उपनगरातील मोठी बांधणी पूर्ण झाली तरी त्याच्या पूर्णत्वाचा दाखला देण्याची प्रक्रिया लवकर होत नाही. त्यामुळे घरफाळा लावला जात नाही. वेळेत घरफाळा लावून वसुली केल्यास महानगरपालिकेच्या मिळकतीमध्ये कोट्यावधी रुपयाची भर पडणार आहे. यासाठी टी. पी. विभागाचे स्वतंत्र व त्रयस्थ यंत्रणेमार्फत किमान गेल्या पंचवीस वर्षापासूनचे ऑडिट करावे.यातून महानगर पालिकेचे किती नुकसान झाले आणि संबंधित अधिकाऱ्यांना किती फायदा झाला हे उघड होईल. पाणीपट्टी बिल वाढ आणि घरफाळा वाढ रद्द करून जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी निवेदनात केली आहे.

या निवेदनावर अशोक भंडारे, जयकुमार शिंदे, बाबासाहेब पवार, संदीप घाटगे, महादेव पाटील, सुनील घरपणकर, अमरसिंह निंबाळकर, फिरोजखान उस्ताद, सदाशिव पाटील यांच्या सह्या आहेत.