शिरोळमधील क्रीडासंकुल जागेचा प्रस्ताव तातडीने सादर करावा – ना. यड्रावकर

0
78

शिरोळ प्रतिनिधी (सुभाष गुरव) : शिरोळ तालुक्यासाठी शिरोळ येथे मंजूर झालेल्या क्रीडा संकुलाबाबत सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या आग्रहास्तव बुधवारी मंत्रालयातील क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या दालनात बैठकीचे आयोजन केले होते. क्रीडा संकुलाच्या जागेबाबत सर्व विभागाचे अभिप्राय घेऊन तातडीने प्रस्ताव सादर करावा, जागेचा ताबा आगाऊ देणेबाबत शक्यता पडताळून पाहाव्यात तसेच कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी जागा ताब्यात देणेबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे आदेश क्रीडामंत्री नामदार सुनील केदार यांनी बैठकीत दिले असल्याची माहिती यड्रावकर यांनी दिली.

तसेच कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी क्रीडा संकुल बाबतचा प्रस्ताव सत्वर सादर करावा असेही नामदार केदार यांनी यावेळी बैठकीस उपस्थित जिल्हा क्रीडा अधिकारी यांना निर्देश दिले असल्याची माहिती यड्रावकर यांनी दिली आहे. शिरोळ येथील क्रीडा संकुलासाठी लागणारा निधी मंजूर झालेला आहे.

शिरोळ हे तालुक्याचे मुख्य आणि मध्यवर्ती ठिकाण असलेने तेथे क्रीडा संकुल उभारले जावे यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू होता. क्रीडा संकुलासाठी आवश्यक असणारी ५ एकर जागा शिरोळमध्ये उपलब्ध होऊन मिळाली होती. पण क्रीडा संकुलासाठी मंजूर असलेल्या जागेमध्ये पोलीस प्रशिक्षण रनिंगसाठी आवश्यक असणारी चारशे मीटरची धावपट्टी करता येत नव्हती त्यासाठी वाढीव २ एकर जमिनीची आवश्यकता होती. याबाबत देखील बैठकीत सविस्तर चर्चा झाली, कोल्हापूर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभाग घेतला. बैठकीस शिरोळ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष अमरसिंह माने-पाटील, कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी साखरे, शिरोळचे मुख्याधिकारी तैमुर मुलानी यांच्यासह संबंधित विभागाचे मंत्रालयीन अधिकारी उपस्थित होते.