रांगोळी (प्रतिनिधी) हातकणंगले तालुक्यात सर्वात जास्त लम्पी रोगाची लागण रांगोळी येथील गायींना झाली आहे. यामुळे लम्पीग्रस्त गायींची योग्य ती खबरदारी घेण्याचे आणि कोणतीही वैद्यकीय अडचण आल्यास गोकुळच्या वैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले आहे.

चेअरमन विश्वास पाटील व गोकुळच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या टीमने रांगोळी गावास भेट देऊन पाहणी केली. रांगोळीत लम्पीमुळे १० ते १२ गायींचा मृत्यू झाला आहे. शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून सर्वत्र जोरदार लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे विश्वास पाटील यांनी गायींच्या अनेक गोठ्यांना भेटी दिली. यावेळी पाटील यांनी श्रीकृष्ण दूध डेअरीस भेट दिली. डेअरीमार्फत दूध उत्पादक शेतकरी यांच्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, प्रकाश पाटील, दशरथ चव्हाण, प्रफुल्ल मगदुम, बापुसो मुल्लाणी, दत्तात्रय सादळे, रजनीकांत मानेव शेतकरी उपस्थित होते.

रांगोळी परिसरातन सर्वात जास्त दुध पुरवठा गोकुळसाठी केला जातो. तसेच लम्पी रोगांचा सर्वात जास्त प्रादुर्भाव रांगोळी परिसरात झाला आहे. यामुळे लम्पीने मृत्यूमुखी पडलेल्या गायींच्या मालकांना गोकुळच्या वतीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी रांगोळीतील प्रफुल्ल मगदूम यांनी केली आहे. येथील वीर सेवा दल व महावीर गाट फाऊंडेशनच्या वतीने लम्पीग्रस्त रोगांवरील होमिओपॅथिक औषधे मोफत देण्यात येत आहे.