कोल्हापूर (प्रतिनिधी) : विधान परिषदेतील पदवीधर, शिक्षक मतदार संघासाठी १ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर कोरोना आजाराच्या प्रतिबंधासाठी सुयोग्य सॅनिटायझेशन, मास्क, थर्मल गन, रूग्णवाहिका व सुयोग्य औषधसाठी याबाबत मानक कार्यप्रणाली तयार करावी, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले.

पुणे पदवीधर आणि शिक्षक द्विवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज (सोमवार) घेण्यात आली. या बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, मतदान केंद्र त्यांना आवश्यक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाबाबत नियोजन करावे. ५० पेक्षा जास्त गर्दी होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी. परिवहन विभागाने केंद्र निहाय लागणाऱ्या वाहनांबाबत नियोजन करावे. भरारी पथके, टपाली मतपत्रिका यासाठी समन्वय करावा. जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी कोरोनाच्या अनुषंगाने मतदान केंद्र निहाय एसओपी तयार करावी. पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहील याबाबत दक्ष रहावे. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयाने निवडणुकीची तयारी करावी.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी डॉ. स्मिता कुलकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कवितके, विशेष भूसंपादन अधिकारी हेमंत निकम, जिल्हा खनीकर्म अधिकारी अनिल थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी आदी उपस्थित होते.