काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेची प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा : आयुक्त

0
69

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेतील प्रलंबित कामे तात्काळ मार्गी लाऊन योजनेच्या कामाला गती द्या, असे निर्देश महापालिका प्रशासक आणि आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. डॉ.कादंबरी बलकवडे यांनी आज (बुधवार) काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहरास थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या योजनेची पाहणी केली. या पाहणीमध्ये त्यांनी काळम्मावाडी येथील जॅकवेल, राजापूर आणि नरतवडे येथील पाईपलाईन तसेच पुईखडी येथील जलशुध्दीकरण केंद्राच्या कामाची पाहणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, प्रकल्प अधिकारी हर्षजीत घाटगे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी तसेच ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजना तातडीने पूर्ण होण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, वन्यजीव, वन विभाग आणि महावितरण विभाग यांच्याशी योग्य समन्वय ठेऊन प्रकल्पाची कामे प्राधान्याने व्हावीत, यासाठी समयबध्द कार्यक्रम निश्चित करण्याच्या सूचना प्रकल्प अधिकारी यांना प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिल्या. दरम्यान राधानगरी तालुक्यातील राजापूर येथील जॅकवेलच्या कामाचा आणि १८०० मीमी व्यासाच्या गुरुत्ववाहिनी पाईपलाईनच्या सुरू असलेल्या कामांची पाहणी करुन आढावा घेतला. तर नरतवडे येथील चालू असलेल्या पाईपलाईन कामाची तसेच योजनेअंतर्गत पुईखडी येथे बांधण्यात आलेल्या जलशुद्धीकरण केंद्राची पाहणीही त्यांनी केली. ठेकेदार जी. के. सी. कंपनीने ही कामे गतीने करण्यासाठी नियोजन करण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी उप जल अभियंता रामचंद्र गायकवाड, शाखा अभियंता संजय नागरगोजे, योजनेचे तांत्रिक सल्लागार युनिटी कन्सल्टंट, पुणे यांचे प्रतिनिधी विजय मोहिते, आर. बी. पाटील, तसेच ठेकेदार जी. के. सी. प्रोजेक्टस् लि., हैद्राबाद, यांचे प्रोजेक्ट मॅनेजर राजेंद्र माळी आदी उपस्थित होते.