इचलकरंजी (प्रतिनिधी) :  इचलकरंजीसह परिसरात कोरोनाने कहर केला आहे. परंतु, जिल्ह्यातील मंत्रीमहोदयांकडून इचलकरंजीला दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे चांगल्या आरोग्यसेवेचा खेळखंडोबा होत चालला आहे. पालकमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनांचा त्यांना विसर पडला असून शासनाकडून मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा आरोप आ. प्रकाश आवाडे यांनी आज (शनिवार)   पत्रकार परिषदेत केला. जनतेला राजकारणाची नाही तर उपचारांची गरज आहे. जर यावेळी सहकार्य मिळत नसेल तर रस्त्यावरचा संघर्ष करावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात अत्यावश्यक असे शंभर एनआयव्ही व्हेंटीलेटर कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँक व जवाहर साखर कारखाना यांच्यामार्फत देण्याची तयारी दर्शविली आहे. त्यासाठी केवळ मागणीपत्र देण्यास सांगितले असताना प्रांताधिकारी, रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षका मात्र त्यास नकार दर्शवत आहे, हे दुर्दैवी असल्याचे आवाडे यांनी सांगितले. पालकमंत्र्यानी गेल्यावर्षी प्रांत कार्यालयातील बैठकीत रुग्णालयात अतिरिक्त सहा हजार लिटर क्षमतेचा ऑक्सिजन टँक देण्यासह सिटीस्कॅन मशिन देण्याची व बेडची क्षमता वाढविण्याची ग्वाही दिली होती. पण आजतागायत पूर्तता झालेली नाही. त्यामुळे त्यांना येथे सुविधा देण्याची आवश्यकता वाटत नसावी, असे वाटत असल्याचे आ. आवाडे म्हणाले.

कोरोनाचे संकट हे सर्वांनी एकमेकांना सहकार्य करुन सोडविण्याची गरज असताना इचलकरंजी शहराला मदतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे 300 बेडचे केल्यास येथे मेडीकल व नर्सिंग कॉलेज सुरु करण्यास कसलीही अडचण येणार नाही. परंतु जाणूनबुजून या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष केले जात आहे. मी चांगले काही करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये राजकारण आडवे येत आहे. मी काही तक्रार अथवा सुचना मांडण्याचा प्रयत्न केल्यास आरोप करत असल्याची टीका होत असल्याचेही आ. आवाडे म्हणाले.

शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने इचलकरंजीकडे राजकारणाच्या वाकड्या नजरेतून न बघता जनतेला उपचार हवे आहेत त्यासाठी राजकारण बाजूला ठेवून कोणताही दुजाभाव न करता सोयी-सुविधा पुरवाव्यात असे आवाहन आ. प्रकाश आवाडे यांनी केले.

या पत्रकार परिषदेत प्रकाश दत्तवाडे, प्रकाश सातपुते, सुनिल पाटील, संजय केंगार, दीपक सुर्वे, सचिन हेरवाडे, नरसिंह पारीक, सर्जेराव हळदकर, राहुल घाट, कपिल शेटके आदी उपस्थित होते.